शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

निवडुंग

निवडुंग
आवडणारे सखे सोबती , अवतीभवती ..
शब्दाशब्दावरती माझ्या , जीव जडवुनी,
असती ऐकत, हासत खिदळत ..
आणिक मीही बोलत असते ,
किति भरभरूनि ..
पूर्ण मोकळी स्वतःस करुनि ..
निरभ्र सारे ..
निळे, निरागस, निर्मळ, लोभस ..
कधी नव्हे ते अद्भुत घडते ....
मनामनांचे पोत रेशमी ,
हळु उलगडते ..
आणि उमलते ,
एक निकटपण.......
तोच अचानक मधेच दचकुन
पुन्हा थांबते
वाक्य अकारण जरा लांबते ..
ओठांवरती शब्द अधिक जो उमटू बघतो ..
आवेगाने , फिरून तया परतविते मागे ..
मनाआडचे एक गूढ मन होते जागे
म्हणते मजला , ' थांब जराशी '
आणिक नंतर सरसर वाढत वेढत ओढत
माझ्या भवती दाटुन येते,
निवडुंगाचे काटेरी बन ...
अस्तित्वाला पडते कुंपण ..
आणि एकटी ,
एकटीच मी , पूर्ण एकटी ,
कुंपणात त्या...
पडते कोंडुन .....
                   शांता शेळके .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा